सावंगी परिसरा भव्य खाटू श्याम मंदिर उभारणीला लवकरच सुरुवात
५ एकर क्षेत्रावर होणार बांधकाम किरण पाटील दौड यांचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सावंगी (कोलठाणा-कृष्णपूरवाडी) परिसरात भव्य खाटू श्याम मंदिर उभारण्यात येणार असून, यामंदिराच्या उभारणीसाठी शहरातील युवा उद्योजक किरण पाटील दौड यांनी पुढाकार घेतला आहे. मंदिराचे बांधकाम ५ एकर क्षेत्रावर होणार असून, सावंगी बायपास पासून सुमारे ५ किमी अंतरावर हा नवा धार्मिक प्रकल्प साकारला जाणार आहे.
मंदिर परिसरात हरित पट्टा, ध्यानस्थळ, भाविकांसाठी निवास व्यवस्था व आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मंदिराचे शिखर आणि गाभारा राजस्थानी शैलीत आकर्षक रचनेत उभारले जाणार असून, भाविकांना मनःशांतीसह आध्यात्मिक अनुभव मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या उपक्रमामुळे शहराला धार्मिक पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. खाटू श्याम भक्तांसाठी हे मंदिर आशिर्वादस्थान ठरेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.