दहशत वाजवणाऱ्या फाळकुटदादांना कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी सिंघम स्टाईलने दाखविला वचक

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
कुपवाड एमआयडीसी येथील मुख्य सोसायटी चौकात बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी थेट रस्त्यावर उतरून सिंघम स्टाईलने पोलीसी खाक्या दाखवत चांगला चोप दिला. घाडगे यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे कुपवाड परिसरात गस्त घालत असताना, कुपवाड मधील मुख्य चौकात दोन सराईत गुन्हेगार खुलेआम पणे फाळकूटगिरी करत दहशत माजवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घाडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने कारवाई करत कायद्याचा धाक दाखवत गर्दीची परवा न करता त्या दोन्ही सराईतांना जागीच पकडून चांगलाच चोप दिला. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे या परिसरात गडबडीचे व धांदलीचे वातावरण निर्माण झाले होते. घाडगे यांच्या धाडसी व कणखर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जरब निर्माण झाली आहे. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे तोंड भरून कौतुक केले.





