मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याची मोठी कारवाई
२४ तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी ५ सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
गांधीधाम-बेंगळुरू एक्सप्रेस मधील २४ सोन्याच्या चोरी प्रकरणी कुख्यात सासी टोळीतील ५ सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई करून हरियाणातील सासी टोळीचा पर्दाफाश केला आहे.

गांधीधाम- बेंगळुरू एक्सप्रेसमधील २४ तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती. चोरी केलेल्या सराईत गुन्हेगारांनी मिरज येथून गोव्याकडे पलायन करून तेथून दिल्लीला विमान प्रवास करीत सिनेस्टाईल पद्धतीने पलायन केले होते. मिरज लोहमार्ग पोलीस ठाणेच्या सर्वेलन्स पथकाने अत्यंत गुप्त व शिताफिने केलेल्या तपासात हरियाणातील कुख्यात सासा टोळीतील सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये कुलदीप रामफळ, अमित कुमार बळवंत सिंग, अजय सतीशकुमार, मोनू राजकुमार, हवासिंग फतेहसिंग सर्व रा. हरियाणा यांचा समावेश आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना मिरज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांकडून महाराष्ट्रातील विविध भागातील सोन्याच्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. लोहमार्ग पुणे येथील पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, लोहमार्ग सोलापूरचे उपाधीक्षक रवींद्र गायकवाड, लोहमार्ग पोलीस ठाणे मिरजेचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि रूपाली गोरड, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार मोहसीन पटेल, तोफिक पटेल, अन्सार मुजावर, अमर सावंत तसेच लोहमार्ग पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स.पो।नि. प्रभाकर कापुरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी कारवाईत भाग घेतल आहे.





